महापालिका निवडणूक : मालेगावात अर्ज पडताळणीत गोंधळ, रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया

Jan 2, 2026 - 10:41
Jan 2, 2026 - 10:42
 0  1
महापालिका निवडणूक : मालेगावात अर्ज पडताळणीत गोंधळ, रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया

मालेगाव महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१२ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. बुधवारी (दि. ३१) झालेल्या छाननीत १५ अर्ज बाद ठरल्याने ७९७ अर्ज वैध ठरले आहेत. काही अर्जांबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने रात्री उशिरापर्यंत पुनर्पडताळणी सुरू होती.महापालिकेच्या ८४ जागांसाठी निवडणूक होत असून, शहरातील ७ केंद्रांवर अर्जांची छाननी करण्यात आली. 

मनपा प्रभाग समिती क्रमांक २ मधील केंद्र क्रमांक ३ येथे तिघांचे अर्ज फेटाळण्यात आले.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये शेख अश्फाक शेख अमीन यांचा अर्ज प्रस्तावकाचे नाव मतदार यादीत नसल्याने बाद झाला.प्रभाग ७ मधील ‘अ’ गटातील उमेदवार मोहम्मद मुस्तकीम मोहम्मद मुस्तफा यांचा अर्ज जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राची पावती नसल्याने बाद करण्यात आला.
त्याच प्रभागातील ‘क’ गटातील उमेदवार अन्सारी शमा गुलाम नबी यांचे नाव मतदार यादीत नसल्याने अर्ज फेटाळण्यात आला.

केंद्र क्रमांक १ वर दाखल १४० अर्जांपैकी १ अर्ज अनामत रक्कम न भरल्याने, पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने आणि शपथपत्र नसल्यामुळे बाद करण्यात आला.तर आयएमए हॉल (केंद्र क्र. २), दिलावर हॉल (केंद्र क्र. ४) आणि ऊर्दू घर (केंद्र क्र. ७) येथे दाखल झालेले सर्व अर्ज वैध ठरले आहेत.मनपाच्या जुन्या इमारतीतील केंद्रावर एमआयएमचे फिरदोस अय्याज अहमद यांचा अर्ज फेटाळण्यात आला.वाडीया रुग्णालयातील केंद्र क्रमांक ६ येथे रईस अहमद अब्दुल अजीज आणि यास्मिन बानो शेख रफिक यांचे अर्ज बाद झाले.

काही केंद्रांवर अर्ज व वैध अर्जांच्या संख्येत तफावत आढळून आल्याने अधिकाऱ्यांना पुन्हा पडताळणी करावी लागली. त्यामुळे अंतिम अधिकृत आकडेवारी जाहीर होण्यास उशीर झाला.निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार (दि. २) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस असून, ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.

तहसील कार्यालय, आयएमए हॉल, मनपा प्रभाग समिती २ कार्यालय, दिलावर हॉल, मनपा जुनी इमारत, वाडीया रुग्णालय आणि ऊर्दू घर या ठिकाणी पडताळणी केंद्रे होती. प्रत्येक केंद्रावर एका वेळी फक्त एका प्रभागातील उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. उर्वरित प्रभागांच्या उमेदवारांना केंद्राच्या परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow