मालेगाव महापालिकेत महायुती फुटली; भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट स्वतंत्र लढणार
नाशिक : मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील युती अखेर नाट्यमयरीत्या तुटली आहे. तसेच शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातही एकमत न झाल्याने मालेगावात महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून स्थानिक पातळीवर अखेरपर्यंत चर्चा सुरू होत्या; मात्र शिंदेसेनेकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा आरोप करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. यामुळे मंगळवारी (दि. ३१) युतीबाबतची चर्चा थांबवण्यात आली.
मालेगावमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्र निवडणूक लढवतील, अशा हालचाली सुरू होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असतानाही जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत होत नव्हते. त्यामुळे युतीबाबत आधीच संभ्रम निर्माण झाला होता. अखेर जागावाटपाचा तिढा सुटला नाही आणि महायुतीत मिठाचा खडा पडत युती दुभंगली.
दरम्यान, मालेगावात भाजपने काही भूसे समर्थक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे शिंदेसेना आणि भाजपमध्ये युती होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तरीही वरिष्ठ पातळीवरून युती म्हणून लढण्याचे प्रयत्न सुरू होते. स्थानिक स्तरावर बैठका देखील झाल्या. मालेगाव महापालिकेतील २२ जागांपैकी भाजपने १० जागांची मागणी केली होती.
मात्र शिंदेसेनेकडून केवळ ८ जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याने तो सन्मानजनक नसल्याचा आक्षेप भाजप नेत्यांनी घेतला. त्यामुळे अखेर युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले अद्वय हिरे, बंदुकाका बच्छाव तसेच माजी गटनेते सुनील गायकवाड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
भाजपच्या नाराज नेत्यांनी युतीला थेट नकार देत आत्मसन्मानासाठी पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेतली होती. अन्यथा पक्षात फूट पडण्याची शक्यता असून त्याचा फटका संघटन वाढीला बसेल, असा इशाराही अद्वय हिरे आणि बच्छाव यांनी दिला होता. माजी गटनेते सुनील गायकवाड यांनी तर पक्षाचे नेतृत्व न करण्याची भूमिका घेत नाराजी व्यक्त केली होती. अखेर सोमवारी (दि. ३१) पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांची भावना लक्षात घेऊन मालेगाव महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.
What's Your Reaction?